जागतिक चिमणी दिनानिमित्त....
- डॉ. तुषार निकाळजे
२० मार्च हा दिन 'जागतिक चिमणी दिन' ( World Sparrow Day ) म्हणून साजरा केला जातो. तस पाहिलं तर चिमणी हा निरुपद्रवी, लहानगा पक्षी आहे. सध्याच्या जगाच्या प्रगतीच्या मार्गात हा पक्षी कालबाह्य होतो की काय? अशी चर्चा होत असते.
चिमणी या पक्षाच्या माझ्यासारख्या इतरांच्या वाटेला आलेल्या लहानपणच्या आठवणी या आता पुस्तकातील कथा किंवा गोष्टी झाल्या आहेत.
![]() |
World Sparrow Day - जागतिक चिमणी दिन |
लहानपणी घराच्या अंगणात लहान मुलांना जेवण भरविताना आई, बहीण, मावशी, मामी या लहान मुलांना कडेवर घेऊन घरा समोरील अंगणात दिसणाऱ्या चिमणीकडे हात दाखवून हा घास चिऊचा, हा घास काऊचा, हा घास माऊचा असे म्हणत जेवण भरविले जायचे. रात्री झोपताना विविध पक्षांच्या, प्राण्यांच्या गोष्टी सांगितल्या जातात. या गोष्टींमध्ये त्यावेळी व आजही "चिऊताई चिऊताई दार उघड" ही गोष्ट आवर्जून सांगितली जाते.
चिमणी या विषयावर गोष्टी, गाणे, चित्रपट इत्यादींची निर्मिती देखील झालेली आढळते. १९५२ सालचा 'चिमणी पाखरं' हा चित्रपट, "या चिमण्यांनो परत फिरा रे" हे गीत यांची आज नकळत आठवण होते. वीस वर्षांपूर्वी सकाळी होणारा चिमण्यांचा चिवचिवाट आता ऐकू येत नाही. जगातील निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, पक्षीप्रेमी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत आहेत आणि ते वेगवेगळ्या उपक्रमांमधून दक्षता घेत आहेत. केरळ येथील त्रिशूल जिल्ह्यामध्ये विशेष चिमणी वन्यजीव अभयारण्य याची निर्मिती केली आहे. इतरांनीही अशा बाबतीत प्रयत्नशील असणे अपेक्षित आहे.