तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

तलाठी भरती परीक्षेच्या सुरुवातीच्या गुणवत्ता याद्यांमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार भूमी अभिलेख विभागाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित गुणवत्ता यादीनुसार अपात्र ठरले आहेत.

तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला


मुंबई ( DailyMarathiNews ): तलाठी भरती परीक्षेच्या सुरुवातीच्या गुणवत्ता याद्यांमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार भूमी अभिलेख विभागाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित गुणवत्ता यादीनुसार अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे, यात राज्यात सर्वाधिक २१४ गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचांही समावेश आहे. 

सुरुवातीच्या गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार आता अपात्र

तलाठी भरती परीक्षेतील काही परीक्षा केंद्रांवर झालेला गोंधळ आणि धाराशिव, लातूर येथील केंद्रावरील गैरप्रकारांच्या तक्रारीनंतरही भरती पारदर्शक पद्धतीनेच झाल्याचा दावा राज्य सरकारने केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाकडून सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यात सुरुवातीच्या गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार आता अपात्र ठरले आहेत. याशिवाय ७० संशयित उमेदवारांचे निकालही थांबवण्यात आले आहेत.

महसूल विभागाने संपूर्ण तपासणी न करता निकाल जाहीर केल्याने हा गोंधळ उडाला. आम्ही नावे दिलेल्या संशयितांचा निकाल थांबवला आहे. आतातरी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करूनच नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे. – राहुल कवठेकर, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.

तलाठी भरतीसाठी टीसीएस कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा एकूण ५७ सत्रांमध्ये १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर टीसीएस कंपनीने २८ सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत प्रश्न-उत्तरांबाबत प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा समितीसह अनेक उमेदवारांनी भरतीमधील चुकांवर आक्षेप घेतला. काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करूनच निकाल जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी काही संशयित उमेदवारांची नावेही देण्यात आली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत भूमी अभिलेख विभागाने जानेवारीत गुणवत्ता यादी जाहीर केली. परंतु, काही उमेदवारांनी परीक्षेतील प्रश्नांबाबत आक्षेप नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. त्यावर याचिकाकर्त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानुसार प्रश्नोत्तर तालिकेतील एकूण २१९ प्रश्नांमध्ये/त्यांच्या उत्तर सूचीत बदल करण्यात आले. एकूण ३९ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त केले गेले. २१९ प्रश्नांतील बदलामुळे गुणवत्ता यादीमध्ये बदल झाल्याने जानेवारीतील गुणवत्ता यादीत पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार आता अपात्र ठरले आहेत.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म