एकनाथ खडसे यांचा दिल्ली येथे भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार

काही कारणांमुळे नाराजीतून या घरातून बाहेर पडलो. आता ती नाराजी कमी झाली आहे. त्यामुळे घरात परत जात आहे.

एकनाथ खडसे ( Eknath Khadase ) - (संग्रहित छायचित्र) - DailyMarathiNews


जळगाव ( DailyMarathiNews ): भाजपमध्ये येण्याचा आपला कधीही प्रयत्न नव्हता. भाजपमधील जुने नेते, कार्यकर्ते आपल्याशी चर्चा करताना भाजपमध्ये असायला हवे होते, तुम्ही आले तर बरे होईल, असे सांगत. चार महिन्यांपासून अशा स्वरुपाची इच्छा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत होती. पक्षांतराचा निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाची जिल्ह्यातील परिस्थिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानावर घातली. त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त करून घेतल्यानंतरच भाजपप्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadase ) यांनी सांगितले.

पुढील १५ दिवसात दिल्ली येथे पक्षप्रवेश होणार

अनेक दिवसांपासून भाजप प्रवेशाच्या चर्चावर रविवारी अखेर खडसे यांनी स्वत: पूर्णविराम देत भाजपचे केंद्रीय नेतृत्व ज्या दिवशी ठरवतील, त्या दिवशी पुढील १५ दिवसात दिल्ली येथे पक्षप्रवेश होणार असल्याचे येथे स्पष्ट केले.  शरद पवार यांनी संकटकाळात केलेल्या मदतीबद्दल खडसे यांनी त्यांचे आभार मानले.

रविवारी मुक्ताईनगर येथे परतल्यावर निवासस्थानी खडसे यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना सर्व घटनाक्रम सांगितला. दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यांच्याकडे भाजपप्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. येत्या १५ दिवसांत प्रवेश व्हावा, अशा स्वरूपाचा आपला प्रयत्न असून भाजपप्रवेश हा दिल्लीला होईल, असे खडसेंनी सांगितले.

एकनाथ खडसे यांचा कुठल्याही अटी-शर्तीवर भाजपमध्ये प्रवेश

कुठल्याही अटी-शर्तीवर भाजपमध्ये प्रवेश करत नसल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपच्या जडणघडणीत योगदान राहिले आहे. भाजपमध्ये ४० ते ४५ वर्षे होतो. काही कारणांमुळे नाराजीतून या घरातून बाहेर पडलो. आता ती नाराजी कमी झाली आहे. त्यामुळे घरात परत जात आहे.

खडसे यांना फडणवीस यांच्याकडून कायमच मानाचे स्थान...

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे( Eknath Khadase ) यांच्या भाजप प्रवेशाला देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा विरोध नाही. फडणवीस कधीही खडसे यांच्याविरोधात नव्हते आणि नाहीत. फडणवीस यांनी नेहमीच खडसे यांना मानाचे स्थान दिले आहे, अशी प्रतिक्रिया खडसे यांच्या भाजप प्रवेशाला होत असलेल्या विरोधावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी दिली. भारतीय जनता पक्षाच्या ‘घर चलो अभियाना’मध्ये बावनकुळे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

- News by DailyMarathiNews

Eknath Khadse will join BJP in Delhi

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म