पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तशा या छत्र्या आहेत. काही दिवसांनी परदेशात हवाई सफर करायला ते निघून जातील.
गप्प बसतोय म्हणून वळवळ करु नका...अजित पवार यांचे भावंडांना प्रत्युत्तर (संग्रहित छायाचित्र)
पुणे ( DailyMarathiNews ): माझ्या निवडणुकीत माझी भावंडे कधीच फिरली नाहीत इतकी गरागरा या निवडणुकीच्या निमित्ताने फिरत आहेत. निवडणूक संपल्यानंतर यापैकी एकही तिकडे फिरणारसुद्धा नाहीत. अजित पवार आणि त्याचे कार्यकर्तेच लोकांचे प्रश्न समजून घेणार आहेत हे कोणीही विसरू नका. पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तशा या छत्र्या आहेत. काही दिवसांनी परदेशात हवाई सफर करायला ते निघून जातील. मी गप्प बसतोय याचा अर्थ तुम्ही फार वळवळ करू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी भावंडांना प्रत्युत्तर दिले. मी तोंड उघडले तर तुम्हाला फिरता येणार नाही, हे विसरू नका, असा इशारा त्यांनी दिला.
हृदयात कुठेतरी दुखते म्हणून हे सगळं बोलावे लागत आहे.
गुढीपाडव्यानिमित्त बारामती येथे आलेल्या अजित पवार यांनी गाठीभेटी घेत संवाद साधला. आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी कोणाकोणाचे दूरध्वनी आले हे विजय शिवतारे यांनी माझ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दाखविले. हे दूरध्वनी कोणाचे आहेत हे पाहिल्यानंतर राजकारण कोणत्या पातळीवर आले आहे, याची मला जाणीव झाली. ज्यांच्यासाठी मी जीवाचे रान केले त्यांनीच अशा पद्धतीने माझ्या विरुद्ध गोष्टी करणे हे दुःखदायक होते. हृदयात कुठेतरी दुखते म्हणून हे सगळं बोलावे लागत आहे.
नमो रोजगार मेळाव्यात आम्ही दहा हजार नोकऱ्या तरी दिल्या. तुम्ही एक हजार लोकांना तरी आजपर्यंत नोकऱ्या दिल्या का
गेल्या कित्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचाराला यावे लागले नाही. शेवटची सभा घेऊन मतदान करून निघून जात होता. आता अस काय झाल की तुम्हाला मतदारसंघात इतके फिरावे लागते, असा सवाल अजित पवार यांनी जेष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांचा नामोल्लख टाळून केला. नमो रोजगार मेळाव्यात आम्ही दहा हजार नोकऱ्या तरी दिल्या. तुम्ही एक हजार लोकांना तरी आजपर्यंत नोकऱ्या दिल्या का असा सवाल त्यांनी सुप्रिया सुळे यांना उद्देशून केला. बारामतीत आमच्या माध्यमातून झालेली अनेक कामे विद्यमान खासदारांच्या विकासाच्या पुस्तिकेत बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
८० टक्के आमदार माझ्यासोबत...
पुढच्या पिढीने पक्षाचे काम हातात घेतले याचा अर्थ पक्ष चोरला असा होत नाही. आम्हीही पक्षासाठी योगदान दिलेले आहे. ८० टक्के आमदार माझ्यासोबत येतात याचा अर्थ कुठेतरी काहीतरी योग्य घडत असेल. सतत तुम्ही म्हणाल तेच बरोबर असे दरवेळेस कसे चालेल, असा सवाल अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केला. आज तुम्हाला जे भावनिक आवाहन करत आहेत, त्यांच्या हातात केंद्रातील काहीच नसेल तर ते काय तुमचा विकास करू शकणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढची किमान दहा वर्षे तरी मी तुमचे काम खंबीरपणे करू शकतो
बारामती विधानसभा मतदारसंघात मतदारांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवायचे आहे, मात्र, इतर पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार आज आघाडीवर राहणार आहे. हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे, दशरथ माने, विजय शिवतारे, दिगंबर दुर्गाडे, दादा जाधवराव, बाबा जाधवराव, जालिंदर कामठे, अशोक टेकवडे, राहुल कुल, वासुदेव काळे, रमेश थोरात यांच्यासह पदाधिकारी मनापासून महायुतीच्या उमेदवाराचे काम करीत असल्याचे असे अजित पवार यांनी नमूद केले. जास्त नाही पण पुढची किमान दहा वर्षे तरी मी तुमचे काम खंबीरपणे करू शकतो. त्यामुळे कोणाला साथ द्यायची याचा निर्णय बारामतीकरांनी करायचा आहे, असेही ते म्हणाले.
Ncp Leader Ajit Pawar Warns His Siblings Ahead Of Baramati Lok Sabha Election 2024