परवा दिवशी मी माझ्या स्कूटरवरून चाललो होतो. रस्त्यावर नेहमीप्रमाणेच वाहनांची वरदळ होती. हॉर्नचे आवाज ऐकू येत होते. एके ठिकाणी समोर सायकल चलावीत जाणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष गेले. माझी नजर त्याच्या सायकलला लावलेल्या 0% प्रदूषण या अक्षरांकडे गेली.
त्या सायकल स्वाराला ओव्हरटेक करून मी थोडा पुढे गेलो. त्यांना ओव्हरटेक केल्यानंतर रस्त्याच्या कडेला पुढे जाऊन थांबलो . त्यांना हात करून थांबण्याची विनंती केली. त्यांना सायकल बाजूला घेऊन थांबण्यास विनंती केली. ते देखील बाजूला स्मितहास्य करून थांबले. मी त्यांना नमस्कार केला व दोन मिनिटे बोलावयाचे आहे असे सांगितले. त्यांनी देखील होकार दिला. मी त्यांना त्यांच्या सायकलच्या सीट खाली झिरो पोलूशन बोर्डबद्दल विचारले. त्यांनी त्याबद्दल पुढील गोष्टी सांगितल्या.
मी पर्यावरणाचा पुरस्कर्ता आहे. मी ऑफिसला जाताना व येताना सायकल चालवतो. माझे ऑफिस ते घर व घर ते ऑफिस हे २२ ते २५ किलोमीटर अंतराचे आहे. मी रोज सायकल वापरतो. त्यांना मी त्यांचे नाव विचारले. त्यांचे नाव श्री. भानुदास दुसाने आहे.
![]() |
श्री. भानुदास दुसाने |
ते घरामध्ये, ऑफिसमध्ये व इतरत्र प्लास्टिक, थर्माकोल, कॅरीबॅग वापरण्याचे टाळतात. श्री. भानुदास दुसाने हे नातेवाईकांच्या किंवा मित्र मंडळींच्या वाढदिवस, लग्न किंवा इतर समारंभाला गेल्यास स्वतःच्या बॅगमध्ये स्वतःचे स्टीलचे ताट घेऊन जातात. तेथे असलेले कागदाचे किंवा पेपर डिशेस किंवा प्लास्टिक डिशेस वापरत नाहीत. स्वतः त्या ताटामध्ये जेवतात. यामध्ये त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही.
श्री. भानुदास दुसाने यांच्या आईचे काही वर्षापूर्वी निधन झाले, त्यांच्या आईच्या अस्थी त्यांनी नदीमध्ये विसर्जित केल्या नाही. त्यांनी गावातील एका टेकडीवर खोलवर खड्डा खोदून त्यामध्ये त्या अस्ती विसर्जित केल्या व त्या परिसरामध्ये ११ झाडे लावली. नदीचे प्रदूषण रोखण्याचा हा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद म्हणावा. त्यांची मुले देखील दिवाळीच्या वेळी फटाके वाजवण्याचे टाळतात.
श्री. दुसाने म्हणाले, "मला जमेल तेवढा पर्यावरणाचा समतोल राखण्याचा मी प्रयत्न करीत आहे व भविष्यातही करणार आहे." अशा व्यक्तींची व त्यांच्या कार्याची नोंद प्रत्येकाने घ्यावी.
- डॉ. तुषार निकाळजे