हिट अँड रन प्रकरणात विद्यापीठांचे अभ्यास मंडळ, अधिष्ठाता जबाबदार नाहीत का?

विद्यापीठांच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये वाहन चालन, अपघात, सामाजिक जबाबदारी, रस्ते, सुरक्षा , व्यवस्थापन यांचा उल्लेख नाही....

- डॉ. तुषार निकाळजे



पुण्यातील चार चाकी अपघात प्रकरण ( Pune Porsche Accident Hit And Run Case ) सध्या भारतभर गाजत आहे. यामध्ये दोन तरुणांना जीव गमवावा लागला आहे. ही बाब अतिशय दुःखद आहे. परंतु ज्या व्यवस्थांच्या चुकांमुळे ही घटना घडली, त्यांचा निषेध करणे आवश्यक आहे.

आजपर्यंत या प्रकरणात पोलीस प्रशासन, महानगरपालिका, हॉटेल व बार व्यवस्थापन, वैद्यकीय व्यवस्था यांचे पितळ उघडे पडले. या व्यवस्थांच्या नाकर्तेपणामुळे ही घटना घडली आहे, असे प्रतिसाद जनसामान्यांमध्ये उमटत आहे. या प्रकरणात प्रथमतः आरोपी तरुणाला पोलिसांमार्फत निबंध लिहिण्याची शिक्षा ठरवण्यात आली. जर निबंध लिहावयाचा असेल तर त्या विद्यार्थ्यांना किंवा व्यक्तीस त्या विषयाचे थोडेफार तरी प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. परंतु निबंध ज्या विषयावर लिहायचा आहे, त्या विषयाचा विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश नसल्याचे निदर्शनास येत आहे.

पुणे ( Pune ) हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून संबोधले जाते आणि तशी त्याची जागतिक ओळख आहे. पुण्यातील काही विद्यापीठे पाश्चिमात्य ऑक्सफर्ड म्हणून स्वतःची तुलना करतात. परंतु या विद्यापीठांच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये वाहन चालन, अपघात, सामाजिक जबाबदारी, रस्ते, सुरक्षा , व्यवस्थापन यांचा उल्लेख नसल्याचे निदर्शनास येते. विद्यापीठांच्या अभ्यास मंडळांमध्ये आएएस, आयपीएस अथवा तत्सम दर्जाचे अधिकारी निवड केले जात का जात नाही? हा एक संशोधनाचा विषय आहे.

प्रत्येक विषयाच्या अभ्यास मंडळामध्ये प्राध्यापकांव्यतिरिक्त एक तज्ञ नेमला जातो. परंतु नागरी सेवेत, संरक्षण व्यवस्थेत काम करणारे अधिकारी, तज्ञ यांचा अभाव जाणवतो. पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी पुस्तके लिहिलेली आहेत. ती पुस्तके कोणत्याही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात नाहीत, हे दुर्दैव त्यामुळे वाहन चालविणारे तरुण-तरुणी यांना या विषयाचे ज्ञान मिळत नाही. वाहतूक, रस्ते, वाहन चालविणे ही जबाबदारी फक्त पोलीस प्रशासनाची नसून विद्यापीठ शिक्षणाची आहे. कारण वयाच्या 18 व्या वर्षानंतर वाहन चालविण्याचा परवाना दिला जातो. 18 वर्षे पूर्ण झालेला व्यक्ती महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेत असतो, म्हणजे पर्यायाने अशा प्रकारचे विषय विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये असणे अपेक्षित आहे.

विद्यापीठ समाज निर्मितीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. सध्या घडलेल्या हिट व रन ( Pune Porsche Accident Hit And Run Case ) प्रकरणावरून विद्यापीठ खरेच समाज निर्मितीचे केंद्र आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो. या प्रकरणाच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ, अधिष्ठाता , प्र- कलगुरू यांना देखील दोषी का धरू नये?

येत्या जून मध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून व नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांचा व अभ्यास मंडळांमध्ये तज्ञांचा समावेश होणे अपेक्षित आहे. वर्ल्ड रँकिंग आणि मूल्यांकनासाठी कोणतेतरी उपक्रम राबवून पुरस्कार, पारितोषिक मिळवून गुणांकन मिळविणे थांबवावे.

Tags: Pune Porsche Accident Hit And Run Case, Education of Vehicle Driving, Road saftey in University

महत्वाची बातमी -

३०० शब्दांचा निबंध भोवणार? या अटीवर अल्पवयीन आरोपीला जामीन दिल्याप्रकरणी बाल न्याय मंडळातील सदस्यांचीही होणार चौकशी!

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म